नाशिक – वेगवान जेट युगात माझ्या छोट्या छोट्या स्वप्नांना सायकलमुळे नक्कीच गती मिळेल. मी जुन्या सायकलची अपेक्षा केली असतांना माझ्या हाती नवीकोरी सायकल आली आहे.आता माझ्या प्रगतीला वेग येईल असे भावपूर्ण उद्गार अंजली प्रधान हिने उत्स्फूर्तपणे काढले.
निवृत्त वायुसेना अधिकारी सतीश पेठकर विश्वनाथ सेवा समूहाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवीत असतात. त्यांच्या संपर्कात अंजली प्रधान ही दिव्यांग युवती आली. आनंदवली – चांदसी भागात राहून जिद्दीने धडपडणाऱ्या या युवतीला सायकलची गरज होती. पेठकर यांनी पेठे हायस्कूलच्या आपल्या व्हाट्सएप समूहावर छोटेसे निवेदन दिले. त्याला वर्गमित्र व सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप (बाळासाहेब) खातळे यांनी त्वरित उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अंजलीच्या पसंतीनुसार नवीकोरी सायकल त्यांनी खरेदी केली. काल मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत ती प्रदान करण्यात आली. यावेळी उच्च अधिकारी रणजित नांदूरकर व डॉ. मानसी नांदूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अंजलीने सायकल स्वीकारली.ज्येष्ठ पत्रकार संजय देवधर यांनी स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना अंजलीने थोडक्यात आपला संघर्षमय जीवनपट उलगडला. अपंगत्वावर मात करीत तिने एमए, बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र सरकारी किंवा खासगी नोकरीही तिला मिळाली नाही. पोलिओने पाय अधू असतानाही तिने ११ वेळा कळसुबाई शिखर सर केले आहे. ती उत्तम जलतरणपटू असून राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. सध्या ती सक्षम या अपंग सहाय्यता संस्थेत काम करते. तिला समाजाकडून केवळ सहानुभूती नको तर स्वाभिमानाने आपल्या पायांवर खंबीरपणे उभे रहायचे आहे. आपल्या आईचे होणारे अतोनात कष्ट कमी करायचे आहेत असे तिने सांगितले.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणाऱ्या या छोटेखानी कार्यक्रमाला पेठे हायस्कूल व्हाट्सएप समूहप्रमुख अभय बोरा तसेच दिलीप शेवडे, हेमंत जोशी आदी मित्र उपस्थित होते. डॉ. मानसी नांदूरकर यांनी अंजलीला नोकरी मिळवून देण्याची ग्वाही दिली. सुनीता खताळे यांनी आभार मानले. या प्रेरणादायी उदाहरणाने उपस्थित सर्वांच्या नेत्रात आनंदाश्रू तरळले. असे उपक्रम समूहातर्फे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.