साहित्य चपराक
“अस्मानी-सुलतानी संकटांपुढं हतबल होऊन आपण दिवाळी अंक काढणं बंद केले तर समाजात विचारांचं बीज कोण पेरणार? त्यातून काय पिकणार आणि वाचक तरी काय खाणार?…” अशी परखड आणि रोखठोक संपादकीय भूमिका घेऊन दमदार पद्धतीने दिवाळी अंक काढणारे नाव म्हणजे ‘चपराक’.
कोरोनाच्या काळात अनेकांनी दिवाळी अंक काढण्यासाठी नाईलाजाने माघार घेतलेली असताना अथवा आॅनलाइन काढून आखडता हात घेतलेला असताना या काळातही विक्रमी प्रतींचा दिवाळी अंक काढून त्याची महाराष्ट्रभरात दमदार विक्री करून तसेच जगभरातील २५ देशांत त्याचे प्रभावी वितरण करण्याची झेप ‘चपराक’ने यंदा घेतली आहे.
हा वेग पाहून कुणीही आश्चर्यचकीत व्हावे असा हा धडाका आहे.
या सगळ्याच्या जोडीला एका उत्तम दिवाळी अंकाची निर्मितीही करण्यात आलेली आहे. ३१४ पानांचा भरगच्च वाचनीय दिवाळी अंक त्यांनी वाचकांच्या भेटीला सादर केलेला आहे.
यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच वारकरी पंढरीच्या वारीला मुकला आणि त्याला विठू माऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही. त्याची ही सल लक्षात घेऊनच चित्रकार संतोष धोंगडे यांनी या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अतिशय उत्कृष्टरीतीने साकारलेले आहे.
या अंकात तर वाचनीय लेखांची पुरेपूर रेलचेल आहे. प्रवीण दवणे, श्रीनिवास भणगे, दिनकर जोशी, संजय सोनवणी, सच्चिदानंद शेवडे, भाऊ तोरसेकर, अंजली कुलकर्णी, श्रीपाद ब्रह्मे, डॉ. गो. बं. देगलूरकर, हरिश केंची, मंदार कुलकर्णी, वसंत वसंत लिमये अशा अनेकानेक उत्तम लेखकांच्या लेखांचा समावेश आहे. काव्यपुष्पामध्येही महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कवींनी योगदान दिल्याचे दिसून येते आहे.
‘चपराक’मधील उत्साही संपादक मंडळ आणि राज्यभरात त्यांनी उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे या बळावर त्यांनी एकाचदिवशी अनेक ठिकाणी अंकाचे प्रकाशन करण्याचा अभिनव उपक्रमही राबवला आहे.
अंकाविषयीची उत्सुकता संपादकांच्या पोस्टमुळे वाढलेली होतीच. अंक हातात आल्यानंतर तो वाचनीय आणि दर्जेदार असल्याचीही खातरी पटते. चपराकच्या या धडाडीच्या वाटचालीला आणि दमदार प्रयत्नांना ‘शब्दसारथी’ परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
लेखन – पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे –
दिवाळी अंक : साहित्य चपराक
संपादक – घनश्याम पाटील
संपर्क क्रमांक – ७०५७२९२०९२
मूल्य : २५० रुपये.