नाशिक – दिवाळीपूर्वीच नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा ७ व्या वेतन आयोगाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. शासनाच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याच्या अटी ने वेतन कमी होण्यचा धोका असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ७ व्या वेतन आयोग लागू करण्याच्या कार्यपद्धतीमुळे दिलासा मिळून याच धर्तीवर नाशिक मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू करण्याची मागणी मनपातील कामगार संघटनांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे मंगळवारच्या बैठकीत केलेली होती.
याच मागणीचा पाठपुरावा करणेकामी मनपाचे एक शिष्टमंडळाने आज मंत्रालयात जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना देखील वेतन आयोगात वस्तुस्थिती नमूद केली व पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिकेला देखील वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली.
मनपा शिष्टमंडळाच्या निवेदनाचा स्वीकार करुन छगन भुजबळ यांनी वस्तुस्थितीचा व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आदेशाचा अभ्यास करुन तात्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिनांक १४ ऑक्टोंबरच्या शासन आदेशानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच दिवाळीपूर्वी १४ नोव्हेंबरपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर वेतन निश्चिती करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणेचे आदेश दिले व मनपा कर्मचाऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.