नवी दिल्ली – केंद्र सरकारने लक्ष्मीविलास बँकेवर महिन्याभरासाठी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता बँक खातेदारांना दि. १६ डिसेंबर पर्यंत त्यांच्या खात्यातून २५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही माहिती दिली आहे. आरबीआयने असे म्हटले आहे की, या स्थगिती कालावधीत आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय बँक खातेदारास २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास व भरण्यास मनाई आहे.बँकेचे रखडलेले कर्ज निरंतर वाढत असल्याने आणि ही तूट कायम राहील, अशी अपेक्षा असल्याचेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे आरबीआयने लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांना त्यांचे हित पूर्णपणे संरक्षित केले जाईल आणि घाबरून जाण्याची गरज नाही असे आश्वासन दिले आहे. आरबीआयने केनरा बँकेचे माजी नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन टीएन मनोहरन यांना लक्ष्मी विलास बँकेचे प्रशासक म्हणून नेमले आहे. यासह केंद्रीय बँकेनेही डीबीएस बँकेत सदर बँक विलीन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याच वेळी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, वैद्यकीय उपचार, शिक्षण यासारख्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी बँकेचे ग्राहक २५ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढू शकतील.