नाशिक – शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या वतीने ऐन दिवाळी सणांतही दुकाने रात्री 8 पर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे.
कोविड -१९ या साथीचा रोग सर्व देशभर कमी होत असला तरी अद्याप पूर्णपणे संपला नाही म्हणून लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरी भागासह नाशिक जिल्ह्यात निषिद्ध ( बंदी ) आदेश दि. 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी जमाव आणि गर्दी करण्याच्या आदेशाबाबत दुजोरा दिताना सांगितले की, रात्री आठपर्यंत दुकाने तर हॉटेल व रेस्टॉरंट्स रात्री दहापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली जाईल. 1973च्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 144 अन्वये हा आदेश सार्वजनिक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास प्रतिबंधित करतो.
या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्थेच्या कोणत्याही प्रतिकुल किंवा अशांत परिस्थितीसाठी नव्हे तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी या आदेशाचे उद्दीष्ट आहे. तसेच डोईफोडे पुढे म्हणाले की, विवाह सोहळा करण्यास फक्त 50 लोकांना परवानगी आहे आणि अंत्यविधी करण्यासाठी केवळ 2O जणांना परवानगी असेल. तसेच अन्य ठिकाणी चार आणि त्याहून अधिक लोक एकत्रित होण्यास परावृत्त केले जाईल. या आदेशात असेही म्हटले आहे की, जर काही लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळले , तर त्यांना दंड ठोठावला जाईल.