नाशिक – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी जातांना शासनाच्या नियमांचे पालन करा, सध्या रुग्णवाढीचा दर कमी झाला असून तो तसाच नियंत्रित ठेवायचा आहे, त्यामुळे कोणत्याही कारणास्तव रुग्णसंख्येत वाढ होणार नाही यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन आयुक्त कैलास जाधव यांनी केले. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कोरोना बधितांचा आकडा कमी होत असून, रिकव्हरी रेट वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना माहिती देण्यासाठी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी संवाद साधला. शहरातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, रिकव्हरी रेट वाढला आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दिवाळीच्या दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. मास्क नसल्यास दुकानात प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास रुग्णसंख्या वाढणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचप्रमाणे स्वच्छ अभियानाअंतर्गत शहरातील तरुणांनी एकत्र येऊन नव्या संकल्पना सादर कराव्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नागरिकांना फोन करून स्वछतेबाबत आढावा घेतला जाणार असून, यावेळी नागरिकांनी सहकार्य करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. महापालिकेतर्फे रस्ते, गार्डन स्वच्छ केले जात आहेत, संबंधित परिसरातील नागरिकांना विचारले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन केले जात असून पाथर्डी येथे त्याची योग्य विल्हेवाट लावली जात असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला स्वच्छ सर्वेक्षणाच्या शिखरावर नेण्यासाठी नागरिकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.