मुंबई – विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल कुटुंबियांचे सांत्वन करताना पूर्वी विधानसभेत मंजूर झालेला शोकप्रस्ताव त्यांच्या घरी पाठवण्यात येत असे. यापुढे त्या शोकप्रस्तावासोबत त्यांच्या कार्याचा उल्लेख असणारे ‘स्मृतिपत्र’ संबंधित आमदार तसेच संबंधित प्रांत, तहसीलदार यांच्यामार्फत प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करुन सांत्वन केले जाईल. ही नवीन परंपरा यापुढे सुरू करण्यात यावी, असे निर्देश विधानसभेत मांडण्यात आलेला शोकप्रस्ताव मंजूर करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या आजी माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सभागृहात मांडला. यात त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके, माजी मंत्री विष्णू सवरा, माजी मंत्री प्रा. जावेद इक्बाल खान, माजी राज्यमंत्री विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी सदस्य तारासिंह नंदराजोग सरदार, अनंतराव आप्पाराव देवसरकर, नरसिंगराव घारफळकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे आणि डॉ. जगन्नाथ सितारामजी ढोणे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला उजाळा दिला.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, अबु आझमी, कुणाल पाटील, यशवंत माने, जयकुमार रावल, संग्राम जगताप, संग्राम थोपटे, दिलीप माने, ॲड. आशिष शेलार, संजय केळकर, श्रीमती मनीषा चौधरी, किशोर जोरगेवार, मिहीर कोटेचा यांनी शोक प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिवंगत भालके यांच्या सामाजिक तसेच सहकार चळवळीतील आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी सर्व सदस्यांनी केला. दिवंगत सवरा यांच्या शांत, संयमी स्वभावाचा उल्लेख करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी तसेच कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. प्रा. जावेद इक्बाल खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव शोकप्रस्तावावर बोलताना सदस्यांनी केला. दिवंगत विनायकराव पाटील यांच्या कृषी, वन, सहकार क्षेत्रातील कार्याविषयी तसेच प्रयोगशील व्यक्तिमत्त्वाबाबतच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
दिवंगत तारासिंह सरदार यांच्या मितभाषी स्वभावाबद्दल तसेच त्यांनी साईभक्तांसाठी केलेले कार्य, तसेच समाजसेवी कामाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. अनंतराव देवसरकर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करत सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायण किसन पाटील यांनी जामनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. दिवंगत नरसिंगराव घारफळकर यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान तसेच दिवंगत माणिकराव खोपडे यांच्या क्रीडा आणि शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याबद्दल, सुरेश गोरे यांच्या शांत, संयमी व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. वैद्यकीय क्षेत्रात उच्चविद्याभूषित असताना समाजविकासाच्या तळमळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झालेल्या डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या कार्यालाही यावेळी सदस्यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.