मनाली देवरे, नाशिक
….
रविवारी संध्याकाळी आयपीएल २०२० च्या क्वालिफायर–२ सामन्यात दिल्ली कॅपीटल्स विरूध्द सनरायझर्स हैद्राबाद हा सामना होतो आहे. या सिझनमध्ये आत्तापर्यंत झालेल्या एकूण कामगिरीच्या आधारावर जर हा सामना कोण जिंकू शकतो? याचे अनुमान लावायचे झाले तर सहाजिकच दिल्ली कॅपीटल्सचे नाव पुढे येत असले तरी या सामन्यात माञ सनरायझर्सचे पारडे जड आहे, हे नजर अंदाज करून चालणार नाही. त्याची तशी कारणे देखील आहेत.
या सिझनमधली सनरायझर्सची एक कामगिरी अतिशय महत्वाची आहे. त्यांनी दिल्ली कॅपीटल्सला साखळीतल्या दोन्ही सामन्यात पराभूत केले आहे आणि रविवारी पुन्हा आमने सामने येतांना दिल्ली कॅपीटल्सवर याच २ पराभवांचे दडपण असेल. या दोन्ही संघात साखळीतला पहिला सामना अबुधाबीत झाला होता आणि दुसरा सामना दुबईत झाला होता. हे दोन्ही सामने सनरायझर्सने जिंकले आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सामन्याच्या वेळी दिल्ली कॅपीटल्स पुर्णपणे फॉर्मात असतांना देखील सनरायझर्सने दिल्लीचा १५ धावानी पराभव केला होता. त्यानंतर तब्बल एक महिन्याने म्हणजे २७ ऑक्टोबरला दुबईत दोन्ही संघादरम्यान झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सला ८८ धावांच्या फरकाने मोठा पराभव स्विकारावा लागला होता. या दोन्ही सामन्यातले वैशिष्टय म्हणजे सनरायझर्सचा फिरकीपटू रशिद खानने दिल्लीचे प्रत्येकी ३ बळी घेतले होते आणि ते देखील महत्वाच्या फलंदाजांचे.
सनरायझर्सशी सर्वात मोठी ताकद कोणती आहे हे आपल्याला माहिती आहे का? या संघातले ४ परदेशी खेळाडू हे त्यांच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधार आहेत. डेव्हीड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), केन विलीयम्सन (न्युझीलंड), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) आणि रशिद खान (अफगाणिस्तान) यांनी आपआपल्या देशाच्या संघाचे आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व केलेले असल्याने सामना जिंकण्यासाठी पुढे होवून कोणती जबाबदारी पार पाडावी लागते याची या चारही खेळांडूना पुरती जाणीव आहे आणि तसा अनुभव देखील आहे. सनरायझर्ससाठी या सर्व जमेच्या बाजु असल्याने दिल्ली कॅपीटल्सविरूध्द विजय मिळवून त्यांना अंतीम फेरी गाठणे फारसे जड जाणार नाही हीच शक्यता अधीक आहे.