मनाली देवरे, नाशिक
……
शनिवारी डबल धमाका अंतर्गत संध्याकाळी नियोजित वेळेआधीच संपलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ९ विकेटसनी दणदणीत पराभव करून यंदाच्या सिझनमध्ये साखळीत आपणच नंबर वन स्थानावर अढळ रहाणार आहोत, यावर शिक्कामोर्तब केले. हा सामना मुंबईने १४.२ षटकातच संपवला. मुंबईची विजयी धावसंख्या होती १ बाद १११. अशारितीने इथेही १ नंबर या संघासोबतच दिसून आला.
या पराभवानंतर पहिल्या दोन क्रमांकावर सातत्याने राहीलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची घसरण तिस–या क्रमांकावर झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरूध्द त्यांचा एकमेव सामना शिल्लक असून त्यात विजय आणि नेट रनरेटमध्ये सुधारणा, या आधारावरच दिल्ली कॅपिटल्सला स्वतःचे पुढचे भवितव्य निश्चीत करता येणार आहे. मध्यंतरी प्ले ऑफ फेरी सहजगत्या गाठण्याच्या स्थितीत असलेला हा संघ गेल्या ४ सामन्यात सलगपणे पराभूत झाल्याने आता या संघावर प्ले ऑफच्या फेरीतून बाहेर फेकले जाण्याची नामुष्की ओढावली आहे. संघ मजबुत असला तरी त्यांच्यासाठी या सिझनमध्ये दिल्ली अभी भी बहुत दुर है, असे म्हणायला हरकत नाही.
टॉस जिंकून कायरन पोलार्डने दिल्लीला फंलदाजीसाठी आंमञित केल्यानंतर दिल्लीला गाठायची होती ती मोठी धावसंख्या. विजय मिळवायचा आणि नेट रनरेट देखील वाढवायचा अशी दुहेरी कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरलेला दिल्ली कॅपिटल्स माञ अवघ्या ११० धावात गुंडाळला गेला. जसप्रीत बुमरा आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी ३ महत्वपुर्ण बळी घेवून दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. दिल्ली संघात धुरंदर फलंदाज आहेत, परंतु एकाही फलंदाजाला खेळपट्रटीवर तग धरून उभे रहाता आले नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने ही धावखंख्या १४.२ षटकात पुर्ण करून साखळीतला “एक नंबर” आपल्या नावे करून घेतला. इशान किशनने यापैकी एकटयाने ७२ धावा केल्या हे विशेष.
मुंबई इंडियन्स संघासाठी हा निव्वळ विजय नव्हता तर याबरोबरच त्यांनी इतरही बरेच काही साध्य करून दाखवले. नव्या खेळपट़टीचे स्वरूप माहित नसल्याने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याची कर्णधार पोलार्ड कल्पकता, रोहीत शर्मा आणि हार्दीक पांडया हे दोन महत्वपुर्ण खेळाडू संघात नसले तर इतरांनी मिळवून दाखवलेला विजय, बुम बुम करत जसप्रीत बुमराने या सिझनमध्ये २३ बळी मिळवून जिंकलेली पर्पल कॅप आणि इशान किशनने एकटयाने संपवलेली मॅच या मुंबई संघासाठी अतिशय महत्वाच्या आणि ठळक घटना ठरल्या ज्या प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या या संघाची ताकद सिध्द करतात.