नवी दिल्ली – फेब्रुवारीमध्ये येथे उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी अटक झालेले जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद, शर्जील इमाम आणि फैजान खान यांच्या चौकशीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. या तिघांविरोधात दाखल आरोपपत्रांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, सदर आरोपींवर खटला भरण्यासाठी पुरेसे व सबळ पुरावे आहेत.
नागरिकता संशोधन कायदा (सीएए)च्या विरोधात गेल्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. ईशान्य दिल्लीत त्याची झळ मोठी होती. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक सध्या त्याचा तपास करीत आहेत. न्यायालयात दाखल आरोपपत्र म्हटले आहे की, उमर खालिद व शर्जील इमाम हे दोघेही दंगलीतील मुख्य सूत्रधार होते. तसेच ओमरही यात होता. देशाची प्रतिमा डागाळण्यासाठी या दंगली करण्यात आल्या. दंगलीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून त्याद्वारे नागरिकांना भडकविले गेले. खालिद याने बंगाली भाषा बोलणार्या आणि बुरखा घातलेल्या ३०० महिलांना दगडफेक करण्यास बोलविले.
आरोपपत्रात आणखी म्हटले आहे की, ओमर खालिद याने साथीदारांसह दंगलीचा कट रचला. त्याच्याकडे दंगल करण्याचे जणू काही रिमोट होते. खालिद, शर्जील, फैजान आणि ताहिर हुसेन यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत असलेल्या तरुणांना प्रथम दंगलीची योजना सांगितली. त्यानंतर काही लोकांनी प्रथम दंगलीचा कट रचला आणि मग ब्रेन वॉश करून दंगली करणाऱ्याची फौज तयार केली होती, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.