मनाली देवरे, नाशिक
…….
शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४६ धावांनी मोठा पराभव केला. या सीझनमध्ये विजयातले सातत्य राखणाऱ्या ‘यंगिस्तान’ दिल्ली कॅपिटल्सने आज राजस्थान रॉयल्स संघाची १८४ धावांचा पाठलाग करतांना क्षणाक्षणाला कोंडी केली. २० षटकात राजस्थान सघाला आपले सगळे गडी गमावून जेमतेम १३८ धावा करता आल्या. दिल्ली संघाचे कामगिरीतले सातत्य बघून आता एकचं म्हणावे लागेल, दिल्लीची राजधानी एक्सप्रेस सुसाट वेगाने धावते आहे. आणखी एक विजय मिळवून दिल्लीने पाॕईन्टस टेबलमध्ये अग्रस्थान गाठले.
राजस्थान राॕयल्सची पडझड
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स ने २० षटकांत ८ बाद १८४ धावा केल्या होत्या. शारजाहच्या मैदानावर ही धावसंख्या कमी पडते की काय ? असे वाटत असतानाच, दिल्लीचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि मार्कस स्टोइनिस यांनी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य फलंदाजांना बाद करून हा सामना पुर्णपणे एकतर्फी केला. जाॕस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया यांच्यापैकी कुणालाही खेळपट्टीवर जास्त काळ तग धरुन उभे राहता आले नाही.
दिल्लीची उत्कृष्ट फलंदाजी
त्याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी करताना सुरुवातीला पडझड झाली होती. परंतु मधल्या फळीत अष्टपैलू मार्कस स्टोइनिस (३९)आणि पिंचहीटर शिमराॕन हेटमायर (४५) यांनी डाव सावरला आणि संघातर्फे १८५ धावांचे आव्हान उभे केले. राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय परंतु त्याला इतर गोलंदाजांची साथ आजच्या सामन्यात देखील मिळालीच नाही.
शनिवारच्या दोन लढती
शनिवारी डबल धमाका आहे. या सत्रातले २ मोठे सामने शनिवारी खेळले जातील. पहिला सामना अबुधाबीत दुपारी ३.३० वाजता किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होईल. संध्याकाळी ७.३० वाजता दुबईत चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात लढत होईल.