मनाली देवरे, नाशिक
…….
शारजाह मैदानावर झालेल्या एका मोठ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा १८ धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अॕनरीच नाॕर्टजे याने ३३ धावांत ३ बळी घेऊन केकेआर संघाला डोके वर काढू दिले नाही आणि त्याच वेळेला हर्षल पटेल, अमित मिश्रा आणि मार्कस् स्टाॕयनिस यांनी धावगती रोखून धरली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अस्तित्वात असतो तो दबाव, कोलकत्त्याच्या फलंदाजांवर दिसून येत होता. सामन्यात ११ व्या षटकाच्या अखेरीस जिंकण्यासाठी १५ धावांची सरासरी कोलकात्याला आवश्यक होती. परंतु नंतर हे टार्गेट वाढत जाऊन शेवटच्या षटकात २६ धावा करण्याचे मोठे आव्हान कोलकात्त्याला पेलवता आले नाही.
कोलकात्ता नाइट रायडर्स आपल्या गेम प्लान मध्ये फारसे बदल करायला तयार दिसत नाही आणि त्याचाच फटका त्यांना बसतोय. पिंचहिटर म्हणून सलामीला येणारा सुनील नरेन आज सलग चौथ्यांदा सलामीला येऊन अपयशी ठरला. ४ डावात त्याच्या अवघ्या २७ धावा आहेत. २२८ सारख्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतांना सलामीच्या फलंदाजांकडून कडून फार मोठी अपेक्षा असते. नरेन बरोबर शुभमन गिल फारसा यशस्वी ठरला नाही, आणि मधल्या फळीत नितीश राणाचा अपवाद सोडला तर दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल हे दिल्लीच्या जाळ्यात लवकर सापडले.
दिल्ली कॕपिटल्सचे मोठे आव्हान
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या दिल्ली कॕपिटल्सने आज लाजबाब फलंदाजीचे प्रदर्शन केले. शारजाह मैदानाच्या सिमारेषा तुलनेने छोट्या आहेत. फलंदाजांचे नंदनवन ठरणार्या या मैदानावर दिल्लीच्या यंगिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या. त्यात पृथ्वी शॉ ने परत एकदा सलामीला ६६ धावांची सुंदर खेळी केली.
श्रेयस अय्यरची लाजवाब फलंदाजी
दिल्लीच्या श्रेयस अय्यरने आज कर्णधाराला साजेशी खेळी केली. ६ षटकार आणि ७ चौकार….२३१.५७ च्या सरासरीने त्याने आज धावा अक्षरशः कुटून काढल्या. कोलकाता संघाची गोलंदाजी इतकी कमकुवत नाही. आंद्रे रसेल, शिवम मावी, पॕट कमिन्स, सुनील नारायण हे फाॕर्मात असलेले गोलंदाज या संघात आहेत. परंतु, केवळ ३८ चेंडूत ८८ धावा करताना श्रेयस ने फलंदाजीचा लाजवाब नमुना पेश केला.
शनिवारी झालेल्या पहील्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता.
रविवारी दोन सामन्यांची मेजवानी
डबल धमाका वेळापत्रकानुसार रविवारी पहिल्या सामन्यात मुंबई इंडीयन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे संघ शारजाह मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता एकमेकांशी भिडतील. दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबईला खेळला जाईल.