मनाली देवरे, नाशिक
…..
दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात दिलेले १९७ धावांचे “चॅलेंज” रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पेलता आले नाही आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना ५९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून गुणांच्या टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. विराट कोहली (४३ धावा) आज खेळला, परंतु त्याची कामगिरी संघाला मात्र पराभवापासून वाचवू शकली नाही. एकापाठोपाठ एक रॉयल चॅलेंजर्सचे सगळे धुरंदर बाद होत गेले. अखेरीस ९ गड्यांच्या मोबदल्यात या सघाला पडत झडत, अवघ्या १३७ धावांची मजल मारता आली.
दिल्ली निघाली सुसाट
दिल्ली कॅपिटल्सवाले आता मागे वळून बघायला तयार नाही. सुसाट वेगाने सुटले आहेत. तरुण ताकदीच्या खेळाडूंचा एक असा परफेक्ट संघ दिल्ली कॅपिटल्सच्या रूपाने तयार झाला आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर ऋषभ पंत, मार्क्स स्टाॕयनीस यांची नुसती फलंदाजीच नाही, तर कागिसो रबाडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि नाॕर्टजे यांची उत्कृष्ट गोलंदाची यांचा असा काही मेळ बसला आहे. या सिझनमध्ये ५ सामन्यात त्यांचा फक्त एक पराभव झाला आहे. यावरुन यंदा अजुन पुढे जातांना भल्याभल्या संघांना दिल्ली कॅपिटल्स कडून मोठा शह मिळणार आहे हे निश्चित.
दिल्ली कॕपीटल्स लंबी रेस का घोडा ठरणार
आजच्या सामन्यात पृथ्वी शाॕ खेळला. नंतर गरज पडली तेव्हा स्टाॕयनीसने धावा केल्या. श्रेयस अय्यर लवकर बाद झाला परंतु शिखर धवनने ३२ धावांचा हातभार लावला. दिल्ली संघात जास्तीत जास्त तरुण खेळाडू असल्याने जर या खेळाडूंनी विजयाची हवा डोक्यात भरून न घेता यापुढेही असाच टीमवर्कने खेळ खेळला तर आयपीएलच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स संघ पोहोचेल तेव्हा फार आश्चर्य वाटून घ्यायचं कारण राहणार नाही. हा संघ ‘लंबी रेस का घोडा’ होण्याच्या तयारीने सध्या कामगिरी करतोय.
रबाडाचे सर्वाधिक बळी
दुसरीकडे गोलंदाजीत कागिसो रबाडाने या सीझनमध्ये ५ सामन्यात सर्वाधिक १२ बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन अनुभवाच्या जोरावर दबाव टाकतोय. अक्षर पटेल आणि एनरीच नाॕर्टजे धावा द्यायला तयार नाहीत. एकूणच काय, तर विजयासाठी लागणारे एक परफेक्ट रसायन दिल्ली कॅपिटल्स मध्ये ठासून भरले आहे.
मंगळवारचा सामना
अबुधाबीतल्या शेख झईद मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी लढत होईल. या सामन्यात जर मुंबई इंडियन्स विजय झाले तर या संघासाठी ही विजयाची हॅटट्रीक असेल माञ राजस्थान रॉयल्ससाठी पराभवाची देखील हॅटट्रिक असेल. राजस्थान रॉयल्सचे संजू सॅमसन, राहुल तेवटिया आणि जोफ्रा आर्चर यांच्या वैयक्तिक कामगिरीकडे मुंबईला लक्ष ठेवावे लागेल.