मनाली देवरे, नाशिक
…..
एका महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा १३ धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजयरथ रोखण्यात आज राजस्थान रॉयल्सला यश येईल, असे वाटत असतांनाच अखेरच्या षटकात दिल्लीचा नवखा गोलंदाज तुषार देशपांडेने राहुल तेवतिया सारख्या तडाखेबंद फलंदाजाला रोखून धरले आणि अखेरीस हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकता जिंकता गमावला. राजस्थान रॉयल्सच्या एकाही फलंदाजाने आज खेळपट्टीवर तग धरला नाही. दिल्ली कॕपिटल्स खास करून फिरकी गोलंदाजांनी धावा रोखून धरल्या तर मध्यमगती गोलंदाजांनी बळी घेऊन या सामन्यात दिल्लीला बोनस दोन गुणांची कमाई करून दिली. १६१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघ २० षटकांत ८ बाद १४८ धावसंख्ये पर्यंतच मजल मारु शकला.
शिखर तडाखा
जोफ्रा आर्चर याच्या तिखट वाऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची मजबूत भिंत आपल्या संघासाठी फार मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. गब्बर या टोपण नावाने ओळखला जाणारा शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांनी मात्र आज आपला सगळा अनुभव पणाला लावला आणि त्याचमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची धावसंख्या १६१ पर्यंत मजल मारू शकली. शिखर धवनने आज त्याच्या नेहमीच्या शैलीत २ षटकार आणि ६ चौकार मारून १७२ च्या स्ट्राईक रेटने ५७ धावा केल्या.
वैयक्तिक कामगिरीचे चीज झाले नाही
यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक बळी घेणारे जे पहिले दोन गोलंदाज आहेत त्यातला कागिसो रबाडा हा दिल्लीकडून खेळतोय तर जोफ्रा आर्चर राजस्थान राॕयल्स कडून. परंतु रबाडा चे इतर दोन सहकारी आहेत ते म्हणजे फिरकीतला अनुभवी रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल. मात्र जोफ्रा आर्चरला दुसर्या एंड कडून चांगला सहकारी लाभत नसल्याने त्याच्या वैयक्तिक कामगिरीचे चीज होत नाही आणि आज देखील तेच झाले.
गुरुवारचा सामना
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात गुरुवारी शारजा मैदानावर सामना होईल.