नवी दिल्ली/मुंबई – कोरोनाने अनेकांना बेरोजगार केले, उद्योग–धंदे बंद झाले. पण गेल्या काही महिन्यांमध्ये लोक पुन्हा कमी पैश्यांत जगायला शिकले आहेत. काहींनी नव्याने व्यवसाय सुरू केला. काहींनी नव्या क्षेत्रात नोकऱ्या स्वीकारल्या. मात्र या सर्वांत विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांसह अनेक शिक्षण संस्था बंद आहेत. ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.
अलीकडेच दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, पुद्दुचेरी यासह अनेक राज्यांमधील सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. त्यात शाळा–कॉलेज बंद करण्याचे आदेश आवर्जून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी शाळा–महाविद्यालये उघडली होती. शिक्षण व्यवस्था पुन्हा रुळावर येईल, असे दिसत होते. मात्र दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातील शाळा–महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली. अनेक शहरांमध्ये तर कडक लॉकडाऊन असल्यामुळे तशीही शाळा–महाविद्यालये बंद आहेत.
अशीच अवस्था केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच देशात फेब्रुवारीमध्ये शिक्षण रुळावर आले होते. मात्र आता जवळपास देशभरात शाळा–महाविद्यालये बंद आहेत. अनेक राज्यांमध्ये तर शाळा आणि बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्ली, हिमाचल, मध्यप्रदेशात अशी आहे स्थिती
दिल्लीमध्ये ८ व्या वर्गापर्यंतच्या सर्व शाळा बंद आहेत. तर नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अभ्यासासाठी शाळेत येऊ शकणार आहेत. त्यासाठी त्यांना पालकांच्या परवानगीची गरज असेल. हिमाचलप्रदेशमध्ये १५ एप्रिलपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. मध्यप्रदेशातही ८ व्या वर्गापर्यंतच्या सर्व शाळा १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये, असे आदेश दिल्लीच्या शिक्षण मंत्र्यांनी शाळांना दिले आहेत.