नवी दिल्ली – दिल्ली सरकारने १०० स्कूल ऑफ एक्सलन्स उघडल्यानंतर आता जगातील पहिले ‘व्हर्च्युअल मॉडेल स्कूल’ सुरू केले जाईल, अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
२०२१-२२चा ६९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यांनी सादर केला. सलग सातव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, सिसोदिया यांनी सांगितले की, एकूण अर्थसंकल्पाच्या जवळपास एक चतुर्थांश शिक्षण क्षेत्राला निधीचे वाटप करणार आहेत.
नवीन अर्थसंकल्प ‘देशभक्ती’च्या अनुषंगाने असून त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये कट्टर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तसा अभ्यासक्रम लागू केला जाईल. दिल्ली सरकारच्यावतीने राजधानीत जगातील पहिले ‘व्हर्च्युअल मॉडेल स्कूल’ सुरू केले जाणार असून दिल्ली सरकार शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कायदा अभ्यासासाठी देशातील पहिले शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठ आणि कायदा विद्यापीठ देखील सुरू करणार आहे.
सिसोदिया पुढे म्हणाले की, सरकार नवीन शिक्षण मंडळही तयार करणार असून दिल्लीत सैनिक स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. कौशल्य व उद्योजकता विद्यापीठाचे काम सुरू झाले असून यावर्षी क्रीडा विद्यापीठाचे कामही सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उच्च शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने राबविण्याची योजना प्रस्तावित केली आहे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यात अडचण येऊ नये. याबरोबरच कॉलनी, नववसाहतींमध्ये योग प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.