नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र पाठल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी ७ वाजता होणार असल्याचे बोलले जात होते. पण, आता या बैठकीत आघाडीचे नेते सुध्दा सामील झाले आहे. त्यामुळे ही बैठक दिल्ली येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून कमलनाथ व शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित झाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबरच खा. सुप्रिया सुळे सुध्दा उपस्थितीत आहे. परमबीर सिंह यांच्या दाव्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या काल फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या विषयावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीतच फैसला होण्याची शक्यता आहे. रविवारी भाजपने या प्रकरणावरुन राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे हे प्रकरणच चांगलेच तापले आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुणाला तरी खुश करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिले असावे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणातून सुटण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्राचा घाट घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझे आणि शिवसेना यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच हे पत्र आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.