नवी दिल्ली – आर्थिक संकट आणि कोरोनाच्या भीतीवर मात करत सणासुदीच्या काळात खादी उत्पादनांच्या विक्रमी विक्रीमुळे खादी कारागिरांना चांगला फायदा झाला आहे. यावर्षी 2 ऑक्टोबरपासून, केवळ 40 दिवसांत खादीची एका दिवसातील विक्री , खादी इंडिया, या कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली इथल्या फ्लॅगशीप अर्थात मुख्य भांडारातील येथे 1 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
13 नोव्हेंबर रोजी, या भांडारात एकूण 1.11 कोटी रुपयांची विक्री झाली, ही यावर्षी नोंदवलेली एका दिवसातील सर्वोच्च विक्री आहे. टाळेबंदीनंतर पुन्हा व्यवसाय सुरु झाल्यानंतर खादीच्या विक्रीने यावर्षी गांधी जयंतीदिनी (2 ऑक्टोबर रोजी) 1.02 कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता, त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी 1.05 कोटी रुपये आणि 7 नोव्हेंबर रोजी 1.06 कोटी रुपयांची विक्री झाली होती.
या भांडारातील खादीची आतापर्यंतची सर्वोच्च विक्री 1.27 कोटी रुपये 2 ऑक्टोबर 2019 रोजी नोंदवली होती. केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी, खादीची विक्रमी विक्री पंतप्रधानांनी ‘स्वदेशीचा’ विशेषतः ‘खादीचा’ वापर करण्याच्या आवाहनानंतर झाली असल्याचे सांगितले. खादी व ग्रामोद्योगाचा कणा असलेल्या कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने खादी प्रेमी पुढे येत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे. संक्रमण परिस्थितीतही, खादी कारागिरांनी पूर्ण उत्साहाने उत्पादन सुरु ठेवले, त्याला देशवासियांनी त्याच उत्साहाने पाठिंबा दिल्याचे सक्सेना म्हणाले. आर्थिक संकटातही केआयव्हीसीने खादीच्या वाढीचा वेग कायम राखला आहे.
यावर्षी खादी उत्पादनांच्या प्रचंड विक्रीला अधिक महत्त्व आहे. कोविड-19 टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले होते, मात्र केव्हीआयसीने देशभर मास्क, हँडवॉश आणि सॅनिटायजरचे उत्पादन घेतले होते. टाळेबंदीमुळे खादी कारागिरांच्या उपजिविकेवर परिणाम झाला होता. मात्र, पंतप्रधानांनी केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या आवाहनामुळे खादी आणि ग्रामोद्योगाला नवसंजीवनी मिळाली.