चंदीगड – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब आणि हरियाणामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून दोन्ही राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हरियाणाच्या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली असून यावेळी राज्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, दिल्लीलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि टेलिकॉम सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
तसेच पंजाबमध्येही पोलिसांना हाय अलर्ट लावण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्ली घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून राज्यातील पोलिसांना हाय अलर्टवर जाण्यास सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यास व शांतता व सुव्यवस्था राखण्यास सांगितले. ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत राज्यात अशांतता निर्माण होऊ दिली जाणार नाही.
दरम्यान, हरियाणा सरकारने अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनीपत, झज्जर आणि पलवल या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस मुख्य सचिव विजय वर्धन, गृहसचिव राजीव अरोरा आणि पोलिस महासंचालक मनोज यादव यांच्यासह उच्च अधिकारी उपस्थित होते. दिल्लीतील घटनेनंतर सर्व जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.