नवी दिल्ली – एकीकडे दिल्लीतील वाढते कोरोनाचे संक्रमण देशभरासाठी चिंतेची बाब ठरत असताना याच ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, अशी धक्कादायक पण सुखद अशी माहिती पुढे आली आहे. राजधानीतील विदारक परिस्थितीत हेच हॉस्पिटल कसे अपवाद ठरले, हे जाणून घेण्याची उत्सुकताही वाढलेली आहे.
१०६ वर्षांची वृद्धही ठणठणीत
खेरा डाबर येथील चौ. ब्रह्म प्रकाश आयुर्वेदिक चरक संस्थान असे या ठिकाणाचे नाव असून आता याठिकाणी रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आतापर्यंत याठिकाणी दोन हजारांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. यात १ महिन्याच्या बाळापासून ते १०६ वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत प्रत्येक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. याठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी १७० खाटा आरक्षित असून आतापर्यंत एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू येथे झालेला नाही. या रुग्णालयात येणाऱ्या कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक ६० वर्षांवरील रुग्णांचाच समावेश आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, यकृताचे आजार आदींशी सामना करणारे हे रुग्ण आहेत. याठिकाणाहून बरे होऊन घरी गेलेल्यांनी केवळ डॉक्टरांची वागणूक, उपचार प्रक्रिया व व्यवस्थेचेच कौतुक केलेले नाही तर त्यांचा आयुर्वेदावरील विश्वासही वाढलेला आहे. हीच आपली खरी कमाई असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
अतिरीक्त खाटा
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी देखील रुग्णालयाच्या श्रमाचे कौतुक केले आहे. ज्या जून महिन्यात संक्रमणाचा आलेख वाढलेला होता त्यावेळी २० जूनला एकाच दिवशी याठिकाणी १०० रुग्ण भरती झाले होते. खाटा संपल्यामुळे अतिरिक्त खटा लावून व्यवस्था करण्यात आली. येथून बरे होऊन गेलेले रुग्ण आपल्या परिचयातील लोकांनाही माहिती देत असल्यामुळे रुग्णांचा ओढा कमी झालेला नाही. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयाच्या श्रमाचे कौतुक केले आहे. तसेच ट्वीटरच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासन व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
‘आयुष’च्या सूचना
या रुग्णालयाच्या संचालक प्रो. डॉ. विदुला गुज्जरवार यांनी सांगितले की संक्रमणाचा उपचार साऱ्याच पद्धतींसाठी नवा आहे. आम्ही आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार रुग्णांवर उपचार केले. त्यांना औषधे दिली. त्याचे परिणामही चांगले झाले. संशमनी वटी, नागार्दी क्वाथ अमालकी चूर्ण आदींचा वापर औषधांमध्ये केला जात आहे. याठिकाणी एक महिन्याचे बाळही भरती होते. त्याला औषध देणे शक्य नसल्यामुळे आईला देण्यात आले. जेणेकरून स्तनपानाच्या माध्यमातून बाळावर उपचार होऊ शकले.
हास्य योग व समुपदेशन
औषधांसोबत हास्य योग, योग, ध्यान, प्रार्थना व समुपदेशनाच्या माध्यमातूनही रुग्णांवरील मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या सर्व माध्यमांचा अवलंब होत आहे. संस्थेचे अतिरिक्त संचालक डॉ. एन.आर. सिंह यांनी सुरुवातीला आव्हाने खूप असली तरीही प्रशासनाने उत्तम साथ दिल्याचे सांगितले.