नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजधानीतील राजकीय हवा गरम झाली आहे. सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात दानवे यांनीच ट्विटरद्वारे खुलासा केला आहे. दानवे यांनी म्हटले आहे की, साखर कारखान्यांच्या अडचणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर आज शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत चर्चा झाली. दोघांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मंगळवार नंतर या विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची भेट घेणार आहे, असे सांगितले आहे. तर, संजय राऊत यांच्याशी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीबाबत चर्चा झाल्याचे दानवे यांनी सांगितले आहे. मात्र, दानवे यांनी दोन्ही नेत्यांशी वेगळ्याच कारणावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.