जगदीश देवरे, नाशिक
…..
सोशल मिडीयावर फक्त चुकीच्याच गाेष्टी व्हायरल होतात, असे आता मनातून काढून टाका. सध्याच्या कोराेना संकटकाळात दक्षिण दिल्लीतल्या मालवीय नगरमध्ये “बाबा का ढाबा” नावाने व्यवसाय करणा-या कांताप्रसाद, या ८० वर्षीय बाबांचे अश्रु सध्या सोशल मिडीयावर तुफान हीट आहेत आणि इतकेच नाही तर हे अश्रु पुसण्यासाठी इतके सारे नेटकरी सरसावले आहेत की स्वतः कांताप्रसाद यांनाच म्हणावं लागतयं “आता पुरे.”
#BabaKaDhaba या नावाने ही चळवळ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरते आहे. पुढे जाण्यापुर्वी, हा किस्सा काय आहे हे थोडे समजावून घेवू. दक्षिण दिल्लीत असलेल्या मालवीय नगर इलाक्यात कांताप्रसाद हे ८० वर्षीय तरुण “बाबा का ढाबा” नावाने व्यवसाय चालवितात. चहा, दाल, करी, पराठा आणि मटार पनीर ही हे या बाबा का ढाब्याचे मेनुकार्ड. ढाबा म्हणजे थाेडक्यात काय तर एक हातगाडीवरचे दुकान बरं का. खुप फेमस वगैरे काही नाही पण जेमतेम धंदा चालणारा हा ढाबा. ८० वर्षांचे कांताप्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी हे दोघेच रहातात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. परंतु, ते बाबा-आईला सांभाळत नाहीत. बदामी देवी सकाळी ६.३० वाजता ढाब्यासाठीच्या स्वयंपाकाला लागतात आणि ९.३० च्या ठोक्याला ढाब्यावर स्वयंपाक तयार असतो. परंतु कोराेना काळ सुरू झाला आणि व्यवसायाची दैना झाली. मल्टी नॅशनल कंपन्या त्यांच्या व्यवसायात भुईसपाट होवू पहात असतांना या ढाब्याचे आणखी काय होणार ?. परंतु, अब अनलॉककी प्रक्रिया शुरू हाे चुकी है, असे म्हणत आजीबाबांनी पुन्हा कंबर कसली. ढाबा सुरु केला. रोजचा स्वयंपाक, मटार पनीर, पराठा….वगैरे वगैरे. परंतु कोराेना संसर्गाच्या भितीने ग्राहकांची संख्या घटली. इतकी घटली की, रोजचा खर्च सुध्दा भरून निघेना. परंतु, आशावाद मोठा वाईल असतो. एक दिवस पुन्हा आपल्या गाडयावर ग्राहकांची गर्दी हाेईल या आशेने कांताप्रसाद आणि बदामी देवी कष्ट करु लागले.
६ ऑक्टोबरला दिल्लीत रहाणारा आणि दिल्लीत कुठे काय चांगलं खायला मिळतं, या विषयावरचे युटयूब चॅनल चालविणारा एक ब्लाॅगर, गौरव वासन या ढाब्यावर आला. त्याने बाबाला बघितलं, पातेल्यातल्या मटार पनीरच्या स्वादाकडे चाणाक्ष नजरेने बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं हे इतकं चागलं मटार पनीर तर मोठमोठया हॉटेलमध्ये सुध्दा मिळत नाही. त्याने बाबांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. “बाबा आप कितने कमा लेते हो?” या प्रश्नावर बाबा म्हणाले
“रोज २००-३००”. मग या गौरवने पुढचा प्रश्न विचारला, “रोजका खर्चा कितना होता है ?” बाबा म्हणाले “५०० रुपये”… “मतलब आपको तो नुकसान ही नुकसान हो रहा है ” गौरव या चर्चेचे व्हीडीओ चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करीत
हाेता आणि या जीवघेण्या प्रश्नावर कांताप्रसाद बाबांना रडू कोसळलं. काेराेना काळात ग्राहकांची आवक मंदावल्यामुळे तोटयात चाललेल्या व्यवसायाचे दुःख त्यांच्या अश्रूतुन टपकले आणि हाच व्हीडीओ साेशल मिडीयावर पडल्या पडल्या व्हायरल झाला. सोशल मिडीयावरची ही चळवळ इथेच थांबली नाही. वसुंधरा नामक एका महिलेने हा व्हीडीओ शेअर करतांना दिल्लीवाल्यांना एक भावनिक आवाहन करुन टाकलं, “प्लीज प्लीज जा, अाणि मालविय नगर मधील बाबा का ढाब्यावर संधी मिळाली तर नक्की काहीतरी खा”. मग काय, त्या बाबांचे अश्रु, कोरोनाचे संकट आणि सोशल मिडीयावरचे हे भावनिक आवाहन यांचा मेळ बसला आणि दिल्लीतल्या नेटक-यांनी गुगलमॅप वर सर्च करीत बाबा का ढाबा गाठला. गर्दी झाली, अक्षरशः रांगा लागल्या आणि बाबाच्या ढाब्यावरचे काही तरी खावून बाबाला मदत करणा-यांची संख्या वाढली. बाबा का ढाबा व्हायरल झाला. लोक सेल्फी काढून, फोटाे काढून ते शेअर करु लागले आणि आपल्या दोन हातांनी जमेल तेव्यढ्या ग्राहकांची ऑर्डर पुरे करतांना कातांप्रसाद आणि त्यांच्या पत्नीच्या चेह-यावर आनंद बहरला. बाबा म्हणतात
“कोवीड मुळे विक्री होत नव्हती, परंतु आता असं वाटतयं की सगळा भारत आमच्या पाठीशी उभा आहे”.
सेलीब्रिटींनी देखील याची दखल घेतली. सोनम कपुर, रणदीप हुड्डा यांच्यासह दिल्ली कॅपीटल्स संघाचा रविचंद्रन अश्वीन याने ट्वीट करुन कातांप्रसादजींचा बाबा का ढाबा आणखीनच प्रकाशझाेतात आणलायं. अर्थात, ही समस्या एकटया कांताप्रसाद यांची नाहीच. असे अनेक छोटे छोटे व्यावसायीक आपल्या सभोवताली आहेत ज्यांच्या डोळयात कोरानाने अश्रू आणले
आहेत. भिक मागण्यासाठी हात पसरावयाचे नाहीत असा स्वाभिमान बाळगून दारात कधीतरी गि-हाईकांची नक्की गर्दी होईलचं, या आशेने असे अनेक कांताप्रसाद आत्मनिर्भरतेने आजही आपल्या व्यवसायाचा गाडा ढकलत आहेत. आपण या
निमीत्ताने फक्त एक करायला हरकत नाही. असे कांताप्रसाद आपल्यालाही कुठे दिसले तर त्यांच्याकडून नक्की काहीतरी विकत घेवून आणि त्यांच्या जगण्याच्या लढवय्या शैलीला त्यांच्या नकळतपणे आपल्यालाही मदत करता येवू शकते.
सध्या आपल्यालाही एक अनुभव नक्की येत असेल की, आपल्याला जो भेटेल तो निरोप घेतांना एकच सांगतो, “काळजी घ्या”. आपण काळजी घ्यायला शिकतो आहोत, कदाचित शिकलो देखील आहोत. परंतु, आता सिस्टीम अनलॉक हाेत जातांना अशा अनेक कांताप्रसादांची “काळजी करा” असेही सांगावे लागेल हे विसरू नका.