नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या काळात शालेय शिक्षणाला ऑनलाईन स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या थान सिंघ यांनी जबाबदारी घेतली आहे. लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या साई मंदिरात दिल्ली पोलिसांत काम करणाऱ्या शिपायांनी गरीब व असहाय्य मुलांसाठी शाळा सुरू केली आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. थान सिंह हे मूळचे राजस्थान येथील असून सध्या द्वारका येथे राहत आहेत. उत्तर दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून ते कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाउन होण्यापूर्वी गरीब कुटुंबातील मुलांना नि: शुल्क शिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरु केले. कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु, अनलॉकमुळे कोरोना काळात ऑनलाईन पुन्हा सुरू झाले. मात्र ज्या मुलांकडे मोबाईल नव्हते त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. अशा मुलांसाठी नियमांचे पालन करत त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या शाळेत सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.