नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांची दुसरी आरक्षण यादी तयार करण्यासाठी १० ऑक्टोबर पासून टाळेबंदीपूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोविड काळाआधीच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रवाशांची पहिली आरक्षण यादी गाडीच्या निर्गमन वेळेपूर्वी किमान चार तास आधी तयार केली जायची. त्यानंतर दुसरी आरक्षण यादी तयार होईपर्यंत, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जात असे.
गाडीच्या निश्चित निर्गमन वेळेपूर्वी ३० मिनिटे ते ५ मिनिटे या काळात दुसरी आरक्षण यादी तयार केली जात असे. या काळात तिकीट मूल्याच्या परताव्याच्या नियमांना अनुसरून आरक्षण रद्द करण्याची सुविधा उपलब्ध असे.
मात्र, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या २ तास आधी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आता, प्रवाशांची सोय करण्याच्या उद्देशाने प्रदेश रेल्वे प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन, दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार करायला परवानगी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, दुसरी आरक्षण यादी तयार व्हायच्या आधी, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून केली जाईल.
हा बदल १० ऑक्टोबर पासून अंमलात आणण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने त्यांच्या सॉफ्टवेयरमध्ये आवश्यक बदल केले आहेत.