नाशिक – शहरातील तिबेटियन मार्केट येथे असलेले रेल्वे आरक्षण केंद्र अखेर मध्य रेल्वेने सुरू केले आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, आरक्षण केलेल्यांनाच रेल्वेत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी नाशिकरोडला जावे लागत होते. अखेर रेल्वेने हे कार्यालय सुरू कले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चरने यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यात यश आले आहे. तशी माहिती अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे तिबेटियन मार्केट येथील रेल्वे आरक्षण कार्यालय २३ मार्च पासून बंद करण्यात आले होते. रेल्वेने २०० गाड्या सुरु केल्या तरी तिकीट आरक्षण कार्यालय बंद होते. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर हे कार्यालय सुरू झाल्याचे मंडलेचा यांनी सांगितले आहे.
नाशिक शहर तिकीट कार्यालयातून दररोज जवळपास एक हजार तिकीट विक्री होते. त्यातून अंदाजे २५ कोटी रुपयांचा महसूल रेल्वेला प्राप्त होतो. त्यामुळे नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय त्वरीत सुरु करणे गरजेचे होते. प्रवाशांची सोय आणि रेल्वेला महसूल या दोन्ही कारणांनी ते महत्त्वाचे होते. अखेर ते सुरू झाले आहे. रेल्वेचे डिआरएम विवेककुमार गुप्ता, सिनिअर डिसिएम युवराज पाटील, डिसिएम अरूणकुमार यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांनीही पाठपुरावा केला. अखेर हे कार्यालय सुरू झाले आहे.