दिंडोरी : तालुक्यातील म्हेळूस्के येथील अश्विनी संतोष शिंदे व संतोष अशोक शिंदे यांचे सोने व इतर साहित्य हरवले होते. ते नाशिक येथील नारायण पंढरीनाथ सानप यांना सापडले त्यांनी ते प्रामाणिक पणे घरपोच आणून दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अश्विनी व संतोष हे पती-पत्नी बांभार्डे (मातोरी) येथे जात असताना नाशिकमध्ये क्रांतीनगर जवळ नारायण सानप यांच्या मोबाईल शॉप समोर एक पाकीट पडले व मोटर सायकल निघून गेली हे दुकानदार मालक नारायण सानप यांनी पाकीट बघितले व ते पाकीट उचलून घेतले तर त्यात सोने,चांदी, पैसे,आधारकार्ड व बँकेचे क्रेडिट कार्ड असे एकूण ५० ते ६० हजार रुपयांचा ऐवज सापडला. परंतु नारायण सानप यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मनात कोणतीही लालुचपणा न दाखवता त्यांनी त्यातील आधार कार्ड शोधून त्या वरील पत्ता घेऊन व स्वतःची गाडी घेऊन ३५ किलोमीटरवर प्रवास करून थेट म्हेळूस्के गाठले व शिंदे कुटुंबीयांचा शोध घेऊन, आपल्याला सापडलेले सोने-चांदी व इतर ऐवज प्रामाणिकपणे परत केला आहे. त्याबद्दल शिंदे कुटुंबियांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला. शिंदे कुटुंबियांनीही नारायण सानप व किरण सानप यांचा प्रामाणिकपणाबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले. यावेळी सानप कुटुंबीयांच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरात कौतुक करण्यात येत आहे.