– सह्याद्री फार्म्सची यंत्रणा युरोपच्या तोडीची – महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
दिंडोरी: सह्याद्री फार्म्स ही देशातील आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी बनली आहे. या कंपनीने आदर्श मॉडेल उभे केले असून सह्याद्रीने मोहाडी येथे उभे केलेल्या अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि यंत्रणा पाहिल्यावर आपण एखाद्या युरोपीय देशात आल्यासारखा भास होतो, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कवयित्री अनुराधा पाटील यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहकार, कृषी व मराठी भाषामंत्री डॉ. विश्वजीत कदम, पिंपरी-पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपति डॉ. पी.डी. पाटील उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी या पुरस्कारांमागची भूमिका व्यक्त केली. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, ना. धों. महानोर, श्रीनिवास पाटील, स्व. पतंगराव कदम, विनायकदादा पाटील यांना देण्यात आला आहे.
शेतक-यांना सोबत घेऊन मॅाडेल यशस्वी केले
भारताचे माजी कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार आणि त्यांचे बंधू स्व. रावसाहेब शिंदे यांच्या नावाचाही पुरस्कार मला देण्यात आला. हा गेल्या २५ वर्षांतील कामाला मिळालेली पावती आहे. सह्याद्रीने गेल्या १० वर्षांच्या काळात छोट्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक मॉडेल यशस्वी केले. त्याचे श्रेय सह्याद्री परिवारातील संपूर्ण शेतकऱ्यांचे आहे.
विलास शिंदे, सह्याद्री फार्म्स अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक