– जगभरातून उदंड प्रतिसाद
– जागतिक कृषी महोत्सवाची विक्रमी वाटचाल
– महाराष्ट्र, परराज्य व परदेशासह ११ लाखापेक्षाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचला कृषी महोत्सव
दिंडोरी : दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषीमहोत्सव सप्तहास २२ जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्र, परराज्य व परदेशात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला होता. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितल्याप्रमाणे सुमारे ११ लाखापेक्षाही अधिक शेतकऱ्यांपर्यंत जागतिक कृषी महोत्सव पोहचविण्याची क्रांती सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभागाच्या सर्वच कृषी प्रतिनिधींनी करून दाखविली. गेल्या पाच दिवसात नेपाळ व जपानसह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, रायपुर या ठिकाणी ८६५ पेक्षाही अधिक ठिकाणी थेट शेताच्या बांधावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या पाच दिवसांत प्रत्येक ठिकाणी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण देऊन गोकृपाअमृत, जीवामृत, अमृतजल यासारख्या विविध सेंद्रिय खत-औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. स्वयंरोजगार अंतर्गत सुमारे साडेचार हजार पेक्षाही अधिक बेरोजागारंची नोंदणी झाली असून विवाह संस्कार विभागांतर्गत सहा हजार शेतकऱ्यांच्या विवाहेच्छुक मुला-मुलींची नोंद केली गेली. आदिवासी भागातील कृषी महोत्सवात रानभाज्या व तनभाज्यांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
“दिंडोरी प्रणीत सेवामार्ग” या युट्युब चॅनेलद्वारे विविध ऑनलाईन चर्चासत्रांच्या माध्यमातून १२ कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनाचा दहा हजारपेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये नैसर्गिक शेतीतून स्वावलंबी शेतकरी, भाजीपाल्यातून आर्थिक समृद्धी, भारतीय गाईंचे संवर्धन व संगोपन, अध्यात्मिक /प्राचीन शेती, कृषी जोड व प्रक्रिया उद्योग, कृषी जोड व प्रक्रिया उद्योग, विषमुक्त परसबाग, देशी बीज संवर्धन अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
भरपूर ठिकाणी काही कृषीविषयक कंपन्यांचे स्टॉल ठेवण्यात आले होते याद्वारे ३०० पेक्षाही अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे चंद्रकांतदादा मोरे, नितीन भाऊ मोरे व जागतिक कृषीमहोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे धिकाधिक शेतकऱ्यांना कृषीमहोत्सवाचा लाभ घेऊन सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी पुढे यावे.
विशेष म्हणजे आयोजक आबासाहेब मोरे या पाच दिवसांत नाशिक, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागातील तब्बल २२ पेक्षाही अधिक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीत होते आणि पुढील दोन दिवसांत आणखी ८ ठिकाणी हजर राहणार आहेत.
कृषी महोत्सवाच्या विशेष बाबी:
अति दुर्गम भागात देखील कृषीमहोत्सव: विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, सुरगाणा, हरसुल, बेळगाव या सारख्या अति दुर्गम भागात देखील कृषीमहोत्सवांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा सत्कार: चंद्रपूर, बीड, सोलापूर, पुणे, नाशिक, लातूर उस्मानाबाद, मध्यप्रदेश, गुजरात, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, पालघर, सिंधुदुर्ग आदि ठिकाणच्या कृषी महोत्सावात सेंद्रिय शेती करणाऱ्या व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वजाती धर्मियांचा कृषी महोत्सव: शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश असणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवात अबालवृद्धांसह हजारो तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभागी होतांना दिसले. तसेच विविध ठिकाणच्या कृषीमहोत्सवात शीख, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध अशा विविध जाती-धर्मातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भारतीय एकात्मतेचे जणू दर्शनच घडविले.