दिंडोरी :दिंडोरी नगरपंचायतत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज शुक्रवार दि. २७ रोजी सकाळी सकाळी ११ वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर दिंडोरी येथे होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली. दिंडोरी नगरपंचायत कार्यकारिणीची मुदत जानेवारीत संपत असून निवडणूकपूर्व कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.आरक्षण सोडत प्रारूप प्रभाग रचना जाहीर सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जाहीर केली आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती,नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी आरक्षण तसेच महिलांसाठी आरक्षण ,सर्वसाधारण जागेवर महिला आरक्षण सोडत शुक्रवार २७ रोजी होणार आहे. प्रभाग रचनेचे प्रारूप बुधवार २ डिसेंबर रोजी पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. २ डिसेंबर ते ९ डिसेंबर दुपारी तीन पर्यंत मुख्याधिकारी नगरपंचायत दिंडोरी यांचेकडे हरकती व सूचना सादर करता येणार असून हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी साठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र कळविण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतो याकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे.