दिंडोरी : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी मडकीजाम येथील शेतकऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको करत निषेध करून सदर अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे व कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मडकीजाम येथील निवृत्ती भास्कर बोराडे या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे. तरी वीज जोडून द्या यासाठी वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता बोरकर यांना फोन केला. सदर अधिकाऱ्यांनी अर्वाच्य शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. तसे फोन ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले. यानंतर आज शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत शेतकऱ्यांनी दिंडोरी येथे उस्फुर्त पणे जमा होत दिंडोरी पालखेड चौफुलीवर रास्ता रोको केला. सदर अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली. यात सर्वपक्षीत नेते सहभागी झाले. यावेळी शिवसेना नेते प्रवीण जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, जिल्हाउप्रमुख कैलास पाटील, संतोष मुरकुटे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, काँग्रेस नेते प्रितम देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, गंगाधर निखाडे, डॉ योगेश गोसावी, सचिन देशमुख, शाम हिरे,नगरसेवक प्रमोद देशमुख, प्रमोद मुळाने, गोटीराम जगताप ,विनायक शिंदे, नितीन आव्हाड, प्रभाकर वडजे आदी उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा दबाव ? पोलीस निरीक्षकांची बदली
शेतकरी शिवीगाळ प्रकरणात शेतकऱ्यांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार झाला असताना उलट सदर अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी शेतकऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा तात्काळ अटक करावी असा दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यावर आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तरी कुणाचा दबाव होता या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते प्रवीण जाधव यांनी केली.