दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वर्ग गावातील विविध सात ठिकाणी भरतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत विविध ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांचा उपयोग केला जात आहे. त्याचबरोबर रविवारसह सर्व सुट्टीच्या दिवशी एकाच परिसरात राहणारे सर्व वर्गातील विद्यार्थी रोज सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत एकत्र येऊन ग्रुपमध्ये बसून अभ्यास करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन केले जाते. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांची गटप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली असून त्या गटप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास वर्ग भरतो आहे. शाळेतील शिक्षक नियोजनाप्रमाणे आठवड्यातील दोन दिवस या अभ्यासवर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शन करतात. ग्रुपला थोर राष्ट्रपुरुषांची नावे देण्यात आलेली असून या उपक्रमाचे नियोजन शाळेतील उपक्रमशील शिक्षक विलास जमदाडे यांनी केले आहे. विद्यार्थीच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असून विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया घडत असल्याने सर्वच विद्यार्थी ठिकठिकाणच्या अभ्यासवर्गात अभ्यास करतांना रममाण झालेले दिसून येत आहेत. शिक्षक उपस्थित नसले तरीही अभ्यासवर्ग रोजच सुरू असतो. वनारवाडी गावचे उपसरपंच दत्तात्रय भेरे, भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भेरे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, गुलाब ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, मोहाडी बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप व केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे यांच्या मार्गदर्शनानुसार वनारवाडी शाळेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकामी मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप व सुनंदा अहिरे आदी शिक्षकांनी शाळा स्तरावर नियोजन करून आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केलेले असून त्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसून १०० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून असल्याने शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातील पालक वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे.
सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी गटागटात बसून अभ्यास करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी वनारवाडी शाळेत सुरू असून रविवारसह सर्व सुट्टीच्या दिवशी देखील विद्यार्थी गटागटात बसून अभ्यास करतात. विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया साधली जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
– विलास जमदाडे, प्राथमिक शिक्षक