छत्रपती युवा सेनेचे दिंडोरी तहसिलदारांना निवेदन
दिंडोरी – दिंडोरी तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे, ती त्वरित थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा छत्रपती युवा सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा देशमुख यांनी दिला, छत्रपती युवा सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले,
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. या जागतिक महामारीने एकूण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परिणामी शेतकरी आणि सर्वसामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शेतकऱ्याला उभी पिकं बाजारात विकता आली नाही. विक्रीसाठी आलेला द्राक्ष, डाळिंब, कांदा, टमाटा यासारख्या सर्व पिकांवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले, त्यामुळे घेतलेले कर्ज सुध्दा शेतकऱ्याला फेडता आले नाही, दुसऱ्या बाजूला सरकारने कुठलीही आर्थिक मदत शेतकऱ्यांना देऊ केली नाही. अशात वीजपुरवठा खंडीत करण्याचा जो धडाका लावला आहे, दुदैवी तालुक्यातील खेडगाव येथील शेतकऱ्यांला आत्महत्या करावी लागली आहे, महावितरणने ही कारवाई त्वरीत थांबवावी अन्यथा शेतकरी हितासाठी छत्रपती युवा सेना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल व होणार्या नुकसानीस शासन जबाबदार राहील असा इशारा छत्रपती युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी छत्रपती युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रदिप निखाडे, उपतालुकाप्रमुख शाम घडवजे, तालुकासचिव समाधान वडजे, सरचिटणीस शुभम मेधने, संघटक समाधान उदार, दर्शन देशमुख, तुषार पिंगळ आदि उपस्थित होते.