दिंडोरी – तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेती पंपाचा विद्युत पुरवठा तीन दिवसापासून विद्युत वितरण कंपनीने खंडित केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देत विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला,
दिंडोरी तालुक्यात ऊसतोड व द्राक्ष पिकाच्या हंगाम सुरू आहे, ऊस तोड झालेल्या उसाच्या क्षेत्राला तोंड झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागते, तर द्राक्ष पिकाला दर दोन-तीन दिवसातून किमान अर्धा तास पाणी द्यावे लागते, मात्र दहेगाव, वागळुद, लखमापूर सह ओझरखेड धरण क्षेत्र लगतचा विद्युत पुरवठा कंपनीने बंद केल्याने शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा केली, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व वीज बिल भरल्याशिवाय विद्युत पुरवठा सुरळीत न करण्याच्या भूमिकेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार पंकज पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आर एन बोरुडे यांच्यासमोर कैफियत मांडली, व विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला, यावेळी अजित कड, दीपक मोगल, ज्ञानेश्वर कड, निवृत्ती कड, संदीप मोगल, राहुल कड, निवृत्ती मोगल, आदींसह शेतकरी उपस्थित होते,