दिंडोरी : वन विभागाच्या विविध अडचणींसंदर्भात तसेच वन पट्टे, वन तलाव, गौण वनोपज या विषयाबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे उपस्थित मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागांतर्गत येणाऱ्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याची सूचना करण्यात आल्या.
वन पट्टे धारक शेतकऱ्यांसाठी लागवडीखालील क्षेत्रात सपाटीकरण करण्याबाबत तसेच वनपट्ट्यांच्या जमिनीवर शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे, वन विभागातील सोलर वॉटर हिटर पुरविणे, सिमेंट नाला बांधणे, सुतार समाजाला लाकूड खरेदीची परवानगी देणे इ. विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. वनपट्ट्यात पोटखराबा असलेल्या क्षेत्रात शेती केली जाते, ती जमीन लागवडीखालील क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत वन विभागाने विहित मार्गाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच वन विभागांतर्गत विविध योजनांविषयी जनजागृतीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांसाठी कार्यशाळा घ्यावी असे निर्देश झिरवाळ यांनी दिले. या बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे ,आमदार हिरामण खोसकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, मुख्य वनसंरक्षक, नाशिक नितिन गुदगे, वन विभागाचे उप सचिव गजेंद्र नरवणे, अवर सचिव सुनिल पांढरे, आदिवासी विकास विभागाचे सह सचिव भा.रा. गावीत यावेळी उपस्थित होते