दिंडोरी – कोरोनामुळे लॉन्स मंगल कार्यालय गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने कार्यालय चालक व त्यावर अवलंबून असणारे विविध व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहे. शासनाने मंगल कार्यालय लॉन्स वरील निर्बंध शिथिल करुन सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दिंडोरी तालुका लॉन्स मंगल कार्यालय असोसिएशनने मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिंडोरी तालुक्यात अनेक लॉन्स मंगल कार्यालय व्यावसायिक असून त्या सोबतच बँड केटरिंग आदी व्यावसायिक अवलंबून आहे. लॉन्स मंगल कार्यालय बंद असल्याने या व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. सदर व्यवसायासाठी कर्ज काढले ते कसे फेडायचे याची चिंता आहे. तरी शासनाने लग्न व विविध समारंभासाठी ५० ऐवजी ३०० ते ३५० नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, बँड वाद्यास परवानगी द्यावी, वीज बिलात, शासकीय करात सवलत द्यावी आदी विविध मागण्या करण्यात आल्या याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले. यावेळी सचिन देशमुख,योगराज निगळ,संपत शिंदे,संदीप केंदळे, अमर राजे,निलेश चव्हाण,संदीप औटे, योगेश वडजे,रमेश दिघे ,विजय बोराडे आदी लॉन्स मंगल कार्यालय मालक उपस्थित होते