दिंडोरी – पोलीस सेवेत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल दिंडोरी तालुक्याचे भूमिपुत्र सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग कावळे यांना राष्ट्रपती पदक मिळून त्यांचा गौरव होणे, तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असून त्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील रहिवासी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग बाबुराव कावळे यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याबद्दल कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे त्यांचा सत्कार चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग कावळे यांनी आपण आपल्या सेवेत जनतभिमुख काम करत अनेक आरोपींचे प्रबोधन करत त्यांचे जीवन सुधारण्यास मदत केल्याचे सांगितले. पोलिसांकडे आलेल्या दोन्ही घटकांचे समाधान करणे शक्य नसले, तरी प्रबोधनातून त्यांना समजावत त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होणे, आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराने आपणास अधिक लोकाभिमुख काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रास्तविक प्रभारी कार्यकरी संचालक विजय खालकर यांनी केले. यावेळी आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे, युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र देशपांडे, शेतकी अधिकारी मच्छींद्र शिरसाठ ,डेप्युटी चिफ अकाऊंटंट सत्यजित गटकळ, प्रभारी सचिव राहुल उगले, युनियन सरचिटणीस संतोष मातेरे, यांच्यासह अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









