दिंडोरी- कोरोनाचा प्रार्दुभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व कंटेन्टमेट झोनमधील नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंटेन्टमेंट झोनचे अधिकारी व कर्मचारीच पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांनी नागरिकांवर लक्ष ठेवायचं की स्वतःचा किंवा कुटुंबाचा जीव सांभाळायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका, आरोग्य सेवक / सेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका या पाच कर्मचाऱ्याची टीम कंटेन्टमेंट झोन मध्ये नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी ठेवत आहे. पण ज्यांना ही ड्युटी लागली आहे ते स्वतः पॉझिटिव्ह येत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील आई वडील, पती, पत्नी, मुले हे पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांच्या कुटुंबाकडे कोणी लक्ष द्यायचे ? त्यांनी नागरिकांना वाचविण्यासाठी कर्तव्य बजवायचे की कुटूंबाकडे लक्ष द्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑर्डर काढण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याची शहानिशा केली जाते पण ऑर्डर दिल्यानंतर स्वतः कोवीड पाॅझिटिव्ह, घरातील आईवडील, पती, पत्नी, मुलं पाॅझिटिव्ह, येत आहे. त्यामुळे कर्मचारी शिल्लक नसल्याने गर्भवती महिला कर्मचारी, स्तनदा माता यांच्या ऑर्डर द्याव्या लागत आहे.
परंतू अशा कर्मचाऱ्यांच्या सर्रास ऑर्डर निघत असल्याने कोरोना कंट्रोल मध्ये येण्याऐवजी विस्फोट होताना दिसून येत आहे.
रुग्ण संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की या टीम मध्ये नेमणूक करण्यासाठी कर्मचारी पण शिल्लक नाहीत.त्यामुळे शासनाचा आदेश असतानाही ५० वर्ष वयोगटाच्या पुढील कर्मचाऱ्यांना व पुन्हा पुन्हा त्याच त्या कर्मचाऱ्यांच्या नावाने आदेश काढून प्रशासन फक्त आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे. काहींना तर आदेश आल्यानंतर ते स्वतः पॉझिटिव्ह येत आहे व कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह येत असल्याने यांचे आदेश कोणाला द्यायचे हे काम कोणी करायचं असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. व आदेश बदलून दुसऱ्याना दिले जात आहे पण कर्मचारीच जर शिल्लक नसतील तर पुन्हा ज्यांनी ड्युटी केली त्यानाच आदेश देण्यात येत आहे.
ज्यांची या कामासाठी नेमणूक झाली आदेश प्राप्त झाले आणि त्यांच्या कुटुंबातील लोक पॉझिटिव्ह येत आहे. अशा वेळेस त्या कर्मचारी यांची अवस्था खूपच भयानक होत असून त्यांचे स्वतःचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे.
मोठा कंटेनमेंट झोन करावा–
मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला होता त्यावेळी तीन ते चार किलोमीटरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात येत असे.त्यामुळे त्या परिसरात रुग्ण वाढत नव्हते. आता गल्लो गल्ली कंटेनमेंट झोन होत असल्याने फक्त बोर्ड लावून त्या गल्लीतील नागरिक बिनदास्त पणे फिरत असतात आणि त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तीन किलोमीटर चा परिसर पूर्णपणे सील करावा म्हणजे नागरिक फिरणार नाहीत व कोरोनाची साखळी तोडता येईल.
१५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करावा- मनोज ढिकले
या बाबत कंटेनमेंट झोनच्या बाबतीत मोठी गावे, दिंडोरी, वणी या शहरात पूर्णपणे १५ दिवस कडक लॉकडाऊन करावे म्हणजे साखळी तुटण्यास मदत होईल अशी मागणी मनसे चे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले यांनी केली आहे.जीवनावश्यक मेडिकल, किराणा ,भाजीपाला यासाठी पण ठराविक वेळ देऊन बाकी सर्व दुकाने १०० टक्के बंद करून कडक लॉकडाऊन केला तर नक्कीच रुग्ण संख्या वाढणार नाही.तसेच जनतेची सेवा करता करता कर्तव्य बजावणारे कर्मचारी व त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य धोक्यात येईल. यावर प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच जनतेनेही प्रशासनाला मदत करत नियमांचे पालन करावे असे आव्हाहन मनोज ढिकले यांनी केले आहे.
परिस्थिती गंभीर – तहसीलदार पंकज पवार
– दिंडोरी तालुक्यातही कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे , याबाबत दिंडोरी तालुका प्रशासनाने अतिशय सूक्ष्म नियोजन केलेले आहे अशी माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याने मनुष्यबळाची नक्कीच कमतरता जाणवत आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना वरील विषयात लक्ष घालण्यास सांगितले असून सर्वांच्या ऐकजुटीने, सहकार्याने या भयानक संकटावर मात करू या हा विश्वास आहे.नागरिकांही आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाचे नियम पाळावे असे आवाहन पंकज पवार यांनी केले आहे.