दिंडोरी : तालुक्यातील दहिवी येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत असलेले एस .एस .ठोकळे यांना प्रवासात सापडलेली पैसे व दागिने असलेली पर्स मूळ मालकाला परत करून प्रामाणिक पणा आणि माणुसकीचे दर्शन घडविले आहे .ठोकळे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे .
मंगळवार ५ जानेवारीला कृषी सहाययक एस .एस ठोकळे मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घरी परतत असतांना नाशिक येथील काकासाहेब देवधर कॉलेज समोर टीबी सॅनिटोरियम परिसरात एक पर्स सापडली .ही पर्स उघडून पाहिली असता त्यात दोन स्मार्टफोन ,सोन्याचे दागिने ,रोख रक्कम ,चाव्या ,कपडे ,आणि आधार कार्ड ,पॅन कार्ड ,एटीएम कार्ड इ .महत्वाचे कागदपत्रे आणि एक डायरी आढळून आली .सदर डायरी चाळून पाहिली असता त्यात पर्सच्या मूळ मालकाचा पत्ता आढळला .त्या पत्त्यानुसार सदर पर्स सिडको नाशिक येथे राहणारे आणि राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या आंधळे यांची असल्याची निष्पन्न झाले .त्यानंतर ठोकळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने अंबड पोलीस स्टेशन गाठून तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना सर्व हकीकत कथन करून सापडलेली पर्स मूळ मालक आंधळे यांचा शोध घेऊन त्यांना परत करण्याची विनंती केली. डायरीत मिळालेल्या आंधळे यांच्या पत्त्यावरून अंबड पोलिसांनी त्यांचा शोध लावून बुधवार ६ जानेवारीला ठोकळे यांच्या हस्ते आंधळे दाम्पत्याला त्यांची हरवलेली पर्स सुपूर्द केली .यावेळी आंधळे कुटुंबियांच्या वतीने ठोकळे यांना काही रक्कम बक्षीस म्हणून देऊ केली पण ठोकळे यांनी नम्रपणे बक्षिसाची रक्कम नाकारली .त्यांचा हा मनाचा मोठेपना पाहून आंधळे दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी ठोकळे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली .दरम्यान मौल्यवान दागिने असलेली बॅग परत मिळाल्याने आंधळे कुटुंबियांनी समाजात अजूनही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याची भावना व्यक्त केली तर हरवलेली पर्स मूळ मालकाला परत दिल्याने मोठे आंतरिक समाधान मिळाल्याची भावना कृषी सहायक ठोकळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. यावेळी ठोकळे दाम्पत्य ,आंधळे दाम्पत्य ,अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.