दिंडोरी : सिंचन प्रकल्प होत असतांना स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याचे आरक्षण देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावरील विविध वळण योजनांचा पाहणी दौरा केला त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र पाश्चिम वाहिन्या नद्यांद्वारे हे पाणी वाहून समुद्रात जाते या ठिकाणी सदर पाणी अडवत तेथे बंधारे बांधून वळणयोजना व्हाव्या यासाठी राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार पाठपुरावा करत असून त्यादृष्टीने आपण हा दौरा केल्याचे पाटील यांनी सांगत या भागात विविध सिंचन प्रकल्प राबविण्यास वाव असून त्यादृष्टीने सर्वेक्षण करण्यात येईल असे सांगितले. दिंडोरी तालुक्यात विविध नद्यांवर साठवण बंधारे बांधण्यास परवानगी नसल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना अडचण होते तरी सदर बंदी उठवत साठवण बंधारे व्हावे अशी मागणी करण्यात आली यावर बोलताना पाटील यांनी पूर्वी करार झाला असल्याने अडचण आहे. मात्र याबाबत तोडगा काढला जाईल असे सांगितले.तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्च एप्रिल मे जून महिन्यात पाण्याची खरी गरज असते मात्र पाणीपरवानगी ही २८ फेब्रुवारी पर्यंत दिली जाते ती बारमाही द्यावी व अधिक वर्षासाठी द्यावी या बाबत बोलताना त्यांनी यावर अभ्यास करत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.युती शासनाने रद्द केलेल्या पाच वळण योजनांचा पुन्हा सर्वेक्षण करत आवश्यक योजना पुन्हा सुरू केल्या जातील असे सांगितले .ओझरखेड येथील रखडलेला पर्यटन स्थळ प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल बोटिंग च्या माध्यमातुन पर्यटन विकास वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे माजी खासदार समीर भुजबळ,आमदार नितीन पवार,जयंत जाधव,प्रकाश वडजे,विश्वासराव देशमुख आदी उपस्थित होते.