दिंडोरी – दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग तसेच पेठ सुरगाणा तालुक्याला जोडणाऱ्या ननाशी ते दिंडोरी या ३५ किमी रस्त्याची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली असून या रस्त्याची तातडीने नूतनीकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक यांच्याकडून होत आहे .
दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग तालुक्याला जोडणारा ननाशी – दिंडोरी हा महत्वपूर्ण रस्ता आहे .या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी एवढे खड्डे पडले आहेत की वाहन चालवताना चालकाला प्रश्न पडतो की कुठला खड्डा टाळावा आणि त्यातून मार्ग कसा काढावा. तब्बल ३५ किमी चा हा रस्ता असून नित्य वर्दळीचा आहे. परिसरातील .नागरिकांना शासकीय कामासाठी दिंडोरी येथे याच रस्त्यावरून यावे लागते .तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी न्यायचा झाल्यास याच रस्त्यावरून खडतर प्रवास करत न्यावा लागतो. परिणामी रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे येथील प्रवास प्रचंड त्रासदायक आणि वेळखाऊ बनला आहे. सदर रस्ता निळवंडी ते वलखेडफाटा दरम्यान काही ठिकाणी खूपच चिवळ झाला असून त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे . दरम्यान नादुरुस्त आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शारीरिक त्रास तर नित्य होत असतो पण आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेत डांबर गायब होत खडी उघडी पडत वाहनांच्या ये जात रस्ता धुळीत हरवत रस्त्याच्या बाजूची शेतातील पिकांवरही विपरीत परिणाम होत असून श्वसनाचे आजारही वाढत आहे. गेल्यावेळी सदर रस्त्याचे नूतनीकरण झाले मात्र निकृष्ट दर्जामुळे थेट विधानसभेत आवाज उठवला गेला. पण सदर कामाची कोणतीही चौकशी न होता करोडो रुपये पाण्यात जात रस्त्याची काही दिवसात वाट लागत रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
रस्ते होणार नसतील तर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करा
दिंडोरी तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिक आपल्या संतापला सोशल मीडियातून वाट मोकळी करत लोकप्रतिनिधी ना रस्ते करण्याचे साकडे घालत आहे. रस्ते दुरुस्ती करता येत नसेल तर या मार्गांवर हेलिकॉप्टर सुविधा चालू करा असे उपरोधिक टोले ही लगावत आहे.