दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायतीवर प्रशासकपदी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिंडोरी नगरपंचायतीच्या पदाधिका-यांची मुदत २८ जानेवारी रोजी संपुष्टात आली. त्यानंतर दिंडोरी नगरपंचायत प्रशासक कोण येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नगरपंचयात येथे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. दरम्यान दिंडोरी नगरपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रमही लवकरच घोषित होण्याची शक्यता असून १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १५फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १ मार्च २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. निवडणूक हालचालींना वेग आला विविध राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे.