दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले आहे. शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सदरच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हा कॅम्प सुरू करण्यात आलेला आहे. मंगळवारी एकूण ५४ टेस्ट करण्यात आल्या. त्यात चार जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.या कॅम्पमुळे रुग्णांची ओळख लवकर होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करण्यात मदत होणार आहे. दिंडोरी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी नागेश येवले ,वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी सदरच्या टेस्ट शिबिराचे आयोजन केले.अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांनी सदर टेस्ट अनिवार्य असून सर्वांनी सदर शिबिराचा लाभ घेत टेस्ट करून घेण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.