दिंडोरी – येथील नगरपंचायत तर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायत विविध कार्यक्रम राबवित येत असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होऊन पृथ्वी, अग्नी, जल, वायू व आकाश या पाच तत्वांच्या समतोल व संवर्धनासाठी भाग घ्यावा या करीता दिंडोरी नगरपंचायत तर्फे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती. सदर सफाई मोहिमेच्या प्रारंभी हरित कायदा पालनाची शपथ उपस्थित नागरिकांना देण्यात आली. शहरातील पालखेड रोड जिप शाळा व सार्वजनिक वाचनालय येथे सफाई करण्यात आली. या मोहिमेस दिंडोरी नगरांचायतीच्या अध्यक्षा सौ रचनाताई जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते सर्व नगरसेवक उपस्थित होते. मोहिमेस पालखेड रोड येथील जिप शाळेच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले. या सफाई मोहिमेचे नियोजन हर्षल बोरस्ते यांनी केले होते. यावेळी नगरपंचयात चे कार्यालय अधीक्षक प्रशांत पोतदार तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. यावेळी मुख्याधिकारी यांनी नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नगरपंचायत च्या वतीने २८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन केले.