दिंडोरी – दिंडोरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले व अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी भर देत पाच वर्षात ३२ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त करून दिंडोरीचा विकास होत आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. रचना अविनाश जाधव यांनी केले. विविध विकासकामांचे भूमीपूजन लोकार्पण नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दिंडोरी नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत वचनपूर्ती प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या की, दिंडोरी नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून दिंडोरीच्या विकासाची स्वप्न सर्व नागरिकांनी पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यास विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी मोठे योगदान लाभले. त्यांच्यामुळेच आज दिंडोरी शहराचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख, बाळासाहेब जाधव, नरेश देशमुख, विश्वासराव देशमुख, यांचेही सहकार्य लाभले आहे. शहरातील १७ प्रभागांमध्ये आज विकास पहावयास मिळत आहे. दिंडोरी शहरात पूर्वी सांडपाण्यासाठी व्यवस्था नव्हती, त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. त्यास प्राधान्य देत शहरातील अनेक भागात भूमिगतगटारीची कामे केली. पूर्वी शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीलाही निधी मिळत नव्हता. मात्र सततच्या पाठपुराव्यामुळे आज शहरातील अनेक रस्ते काँक्रीटीकरण झाले आहे. तर काही प्रभागांमध्ये सद्यस्थितीत कामे सुरू आहे. शहराचा वाढता विस्तार बघता रस्त्याच्या कामास व शहर सुशोभीकरण करण्यास प्राधान्य देत आहोत असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, भाऊसाहेब बोरस्ते, अविनाश जाधव उपस्थित होते,
जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास
महाराष्ट्रात कोणत्याही नगरपंचायतीने आजपर्यंत जलतरण तलाव बांधण्याचे धाडस केले नाही. मात्र दिंडोरी नगरपंचायतीने नगरउथ्थान योजनेअंतर्गत १ कोटी १५ लाख रुपये उपलब्ध करत जलतरण तलावाचे बांधकाम पूर्णत्वास नेले आहे. तसेच नगरपंचायत हद्दीत तीन मोठी उद्याने बांधली आहे. क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर असून तालुक्याच्या ठिकाणी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मानस सौ रचना जाधव यांनी व्यक्त केला.
पन्नास वर्षानंतर श्रीराम नगरला मिळाले पिण्याचे पाणी,
कोराटे रोडवरील श्रीरामनगर वस्तीला मागील पन्नास वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती. एकाच हातपंपावर पाणी मिळत असल्याने रात्रंदिवस नागरिक रंगा लावून पाणी भरत होते. मात्र नगरपंचायत निर्माण होताच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत ७५ लाख रुपये नवीन जलवाहिनी व जलकुंभ प्रस्ताव मंजुर करत पाणी उपलब्ध होणार आहे.
सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणार
वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पालखेड चौफुली व उमराळे चौफुला येथे सिग्नल बसविणार आहे. शहरातून जाणारा राज्यमार्ग क्रमांक तीन या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. नाशिक- कळवण, सापुतारा या रस्त्यावर वाहनांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे नागरिकांना तासंतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याला आळा घालण्यासाठी पालखेड चौफुली येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे दिला असून मंजुरी येताच काम पूर्ण केले जाईल.
पालखेड रोडचा होणार कायापालट
दिंडोरी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पालखेड चौफुली ते पालखेड एमआयडीसी चौफुली पर्यंत असणाऱ्या रस्त्यामुळे दुकानदारांना धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते, नगर विकास विभागाच्या वतीने रस्त्याची मंजुरी घेत तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून पहिल्या टप्प्यातील काम निविदा स्तरावर आहे. त्यामुळे पालखेड रोडचा कायापालट होणार आहे.
शिवाजीनगरला सर्वाधिक निधी खर्च
शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये सर्वात जास्त कर नगरपंचायतीस प्राप्त होतो. त्या अनुषंगाने तेथील कामाची गरज लक्षात घेता अकरा कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहे, त्यात भूमिगतगटार, उद्यान, रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा प्रभाग पूर्वी दुर्लक्षित होता मात्र या पंचवार्षिकमध्ये या प्रभावाचा पूर्णपणे कायापालट केला आहे.