दिंडोरी – जिल्हा परिषद निगडोळ प्राथमिक शाळेतील मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दिव्यांग विद्यार्थ्याबरोबर गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी संवाद साधला. या संवादानंतर त्याला व्हिल चेअर व रोलेटर ही साधने वितरित करण्यात आली. यावेळी उपस्थित पालकांनी गटशिक्षणाधिका-यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण, पंचायत समिती दिंडोरी यांचे वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेता यावे यासाठी मोफत साहित्य साधने देण्यात येतात. निगडोळ येथील माधव रेहरे यांचा मुलगा समीर हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी असून त्याला चालणे अवघड जात होते. पालकांना शाळेत उचलून न्यावे लागत, ही समस्या लक्षात घेऊन विशेष शिक्षक समाधान दाते यांनी या विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय अलिम्को शिबिरासाठी संदर्भित केले. तज्ञ डॉक्टर यांनी त्यासाठी व्हीलचेअर व रोलेटर ही साहित्य सुचवले व तयार करून देण्यात आली. या विद्यार्थ्याला साहित्य प्रदान करण्यासाठी पालक गट साधन केंद्र येथे घेऊन आले. दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी अधिकारी पदाची भिंत दूर सारत थेट विद्यार्थी व पालकांशी सवांद साधत आस्थेने चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या विद्यार्थ्यांचे पालक यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या मानवतेच्या वागणुकीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी समावेशीत शिक्षण विभागाचे विशेष तज्ञ रोहिणी परदेशी ,ज्ञानेश्वर क्षीरसागर, समाधान दाते, दीपक पाटील,अश्विनी जाधव,वैशाली तरवारे, पौर्णिमा दीक्षित, कल्पना गवळी, रीना पवार आदी उपस्थित होते