दिंडोरी : जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी तीन डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर करण्यात आला आहे. हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी व दिव्यांग बांधवांच्या समस्या मार्गी लागाव्यात या उद्देशाने साजरा केला जातो असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी केले. दिंडोरी तालूक्यातील करंजवण ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना खुर्दळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या मालतीताई खराटे या होत्या. यावेळी परिसरातील दिव्यांग बांधवांच्या अडी अडचणी समजावून घेत,विविध कल्याणकारी शासकीय योजनाची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करंजवण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांनी केले.यावेळी सरपंच श्रीमती रेखाताई मोरे, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे तालूका प्रमुख जयंत थेटे, उपतालूका प्रमुख राजेंद्र शिंपी,दहेगाव सरपंच कविता भोंडवे, आदी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.