दिंडोरी : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी मडकीजाम येथील शेतकऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको करत निषेध करून सदर अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे व कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशी करून दोन दिवसात निलंबन करण्याचे आश्वासन वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर पावणेतीन तासानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मडकीजाम येथील निवृत्ती भास्कर बोराडे या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे. तरी वीज जोडून द्या यासाठी वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता बोरकर यांना फोन केला असता सदर अधिकाऱ्यांनी अर्वाच्य शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप होत असून तसे फोन ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले यानंतर आज शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांनी दिंडोरी येथे उस्फुर्त पणे जमा होत दिंडोरी पालखेड चौफुलीवर रास्ता रोको केला. सदर अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली. यात सर्वपक्षीत नेते सहभागी झाले. यावेळी शिवसेना नेते प्रवीण जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप,राष्ट्रवादी चे नेते प्रकाश वडजे,भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे,जिल्हाउप्रमुख कैलास पाटील,संतोष मुरकुटे,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख,काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड प्रितम देशमुख,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे,राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे,डॉ योगेश गोसावी,सचिन देशमुख,शाम हिरे,नगरसेवक प्रमोद देशमुख,दिलीप जाधव,नरेश देशमुख,राकेश शिंदे,प्रमोद मुळाने,तुकाराम जोंधळे,सुजित मुरकुटे,निलेश शिंदे,लखन पिंगळ,गोटीराम जगताप,विनायक शिंदे,नितीन आव्हाड,प्रभाकर वडजे,प्रकाश आहेर ,विजय वडजे, आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी जोपर्यंत वीज मंडळाचे सक्षम अधिकारी येऊन सदर अधिकाऱ्यास निलंबित करत नाही तो पर्यंत रास्ता रोको सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली उपअभियंता राऊत यांनी आंदोलकांची भेट घेत सदर अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशी करून दोन दिवसात निलंबन प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान सदर सदर व कनिष्ठ अभियंता यांनी परस्परविरोधात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन नवले व कल्पेशकुमार चव्हाण यांचे नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
पोलीस अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा दबाव? पोलीस निरीक्षकांची बदली ?
शेतकरी शिवीगाळ प्रकरणात शेतकऱ्यांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार झाला असताना उलट सदर अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी शेतकऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा तात्काळ अटक करावी. असा दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यावर आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचीही चर्चा आहे. तरी कुणाचा दबाव होता या प्रकाराची चौकशी करावी तसेच बदली त्वरित रद्द करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नेते प्रवीण जाधव यांनी दिला आहे.