दिंडोरी – तालुक्यात शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमार मुसळधार पाऊस पडल्यामुळे तीसगाव धरण पूर्ण भरले. धरणात पहिले ७१ टक्के पाणीसाठा होता. मात्र या पावसाने हे धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. पालखेड धरण ९७ टक्के भरले असून धरणातून ८७४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पुणेगाव धरण ९६.२३ टक्के भरले असून या धरणातून लवकर विसर्ग सोडण्यात येणार आहे. करंजवण धरण ८५.६६ टक्के भरले असून वाघाड धरण ८७.०७ टक्के तर ओझरखेंड धरण ७२.५८ टक्के भरले आहे दिंडोरी तालुक्यात शनिवारी सर्वाधिक पाऊस ननाशी परिसरात झाला आहे. दरम्यान शिंदवड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने टोमॅटोसह अनेक पिकांचे नुकसान झाले तर ओहोळ शेजारील अनेक घरात पाणी घुसत नुकसान झाले.