दिंडोरी : तालुक्यात ६० ग्रामपंचायत निवडणुकीत खेडगाव सह सात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत तर ५३ गावांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवास्तव खर्च टाळत गावातील एकोपा कायम राहावा यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करत बिनविरोध निवडणूक झालेल्या गावांसाठी २५ लाख व ५० लाख विकासनिधी देण्याचे जाहीर केले होते याबाबत गावोगावी चर्चा झाली. अर्ज माघारीच्या दिवशी अनेक गावांमध्ये बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यात अवनखेड व गोंडेगाव येथे जेवढ्या जागा तेवढेच अर्ज भरत बिनविरोध निवड करण्यात आली. तर आज अर्ज माघारीचे दिवशी खेडगाव,जवळके वणी,शिंदवड, जोरण व भनवड या ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध झाल्या. अन्य गावातही काही वार्डाच्या निवडणूक बिनविरोध झाल्या. माघारीच्या मुदतीनंतर निशाणी वाटप होत गावोगाव पॅनल निर्मिती झाली असून ५३ गावांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहे.