दिंडोरी : तालुक्यातील ५७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत बहुतांशी ठिकाणी सत्तांतर होत प्रस्थापितांना धक्का बसत नवोदितांना संधी मिळाली आहे .बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेत प्रामुख्याने लढती रंगत दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या सत्ता खेचल्या आहे. शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जाणारे चिंचखेड,खडक सुकेने,पालखेड बंधारा,सोनजांब मध्ये राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे. तर राष्ट्रवादीची मातेरेवाडी तिसगाव, तळेगाव वणी येथील सत्ता शिवसेनेने मिळवली आहे.आजी माजी आमदार यांनी आपल्या वनारे,वारे गावातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.भाजपचे योगेश बर्डे यांनी म्हेळूस्के येथील सत्ता कायम राखली आहे.युवक काँग्रेसचे वसंत कावळे यांनी बोपेगावची सत्ता कायम ठेवली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिंचखेड येथे दोन जागा जिंकत चंचुप्रवेश केला. आहे.शिवसेनेचे माजी पस सदस्य सुनील मातेरे यांना चिंचखेड येथे पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे माजी पस सदस्य सुनील पेलमहाले चाचडगाव मधून विजयी झाले आहे.लखमापूर येथील आजी – माजी सरपंच यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख पिंपळगाव केतकी येथून विजयी झाले आहे. जोपुळ मध्ये शिवसेनेच्या क्रांती पॅनेलने सत्ता कायम राखली आहे तर लोखंडेवाडी येथे विद्यमान सरपंच संदीप उगले यांच्या ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सत्ता कायम राखली आहे. बिनविरोधची परंपरा खंडित झालेल्या कादवा म्हाळुंगीत परिवर्तन पॅनलने सर्व जागा जिंकत सत्तांतर केले आहे. खेडगाव,अवनखेड,शिंदवड, गोंडेगाव, जवळके वणी,जोरण,भनवड येथील ग्रामपंचायतीं बिनविरोध झाल्या होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत वर्चस्व कायम ठेवल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी केला आहे.
दिंडोरी येथील जुने धान्य गोदाम येथे तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वाजता मतमोजणी सुरू होत पंधरा टेबलवर अकरा फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. .मतमोजणी केंद्राबाहेर गावोगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयाची बातमी समजताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला दरम्यान पिंपळगाव धूम व करंजाळी येथील काही उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत फेरमतमोजनी व फेरमतदानाची मागणी करण्याचे अर्ज दिले. पांडणे येथील एक महिला उमेदवारास एकच मत मिळाल्याने त्यांनी ही आक्षेप घेत तक्रार अर्ज दिला.
सत्तांतर झालेल्या प्रमुख ग्रामपंचायत
चिंचखेड, खडकसुकेने,पालखेड बंधारा,आंबे दिंडोरी,परमोरी, पिंपळगाव केतकी,वलखेड,कादवा म्हाळुंगी,वणी खुर्द,सोनजांब,मातेरेवाडी, तळेगाव वणी,इंदोरे,पांडणे
सत्ता राखण्यात यशस्वी प्रमुख ग्रामपंचायत
लोखंडेवाडी ,जोपुळ,बोपेगाव,म्हेळूस्के, पाडे,वनारे,वारे,चाचडगाव